राजापूर | प्रतिनिधी
राजापूर तालुक्यात शाश्वत कोकण परिषदेची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. बारसु, देवगड आणि पूर्णगड परिसरात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेत विविध गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, मच्छिमार, बागायतदार, विद्यार्थी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मुंबईत वास्तव्यास असलेले कोकणवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी सर्वानुमते ‘कोकण अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघ’ या नव्या आघाडीची स्थापना करण्यात आली.
राजापूर, बारसु, पन्हळे धोपेश्वर, नाणार, देवगड, मुणगे, हिंदळे, मिठगवाणे, पूर्णगड, उपळे, सोलगाव, गोवळ, शिवणे खुर्द, देवाचे गोठणे, साखरी नाटे, होळी, जैतापूर, गावखडी, कुंभवडे, आडिवरे, देवीहसोळ, नारीग्रे, बागमळा आणि जुवे या गावांतील नागरिकांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सभेत पर्यावरण अभ्यासक तथा ‘रानमाणूस’ म्हणून परिचित प्रसाद गावडे यांच्यासह अणुऊर्जा प्रकल्पांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि विविध जनआंदोलनांचा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक परिणाम याविषयी सविस्तर मांडणी करण्यात आली.
यावेळी शाश्वत कोकण परिषदेने केवळ विनाशकारी प्रकल्पांना विरोध करण्यापुरते मर्यादित न राहता कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यायी रोजगारनिर्मिती, महिला नेतृत्व आणि उद्योजकता, गावातील युवक-युवतींच्या विवाहासमोरील सामाजिक प्रश्न, तसेच वानरांमुळे होणारे शेतीचे नुकसान आणि वाढता मानव-वन्यजीव संघर्ष यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा केली.
कोकणच्या पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत सभेचा समारोप करण्यात आला.





