मुंबई : मुंबईतून कोकणात प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या रत्नागिरी–दिवा पॅसेंजर ट्रेनबाबत रेल्वे खात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन पूर्वीप्रमाणे दादर स्थानकापर्यंत चालवावी, ही मागणी स्पष्टपणे फेटाळण्यात आली असून प्रवाशांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.
कोरोना काळात बंद करण्यात आलेली रत्नागिरी–दादर पॅसेंजर सेवा अद्यापही पूर्ववत करण्यात आलेली नाही. सध्या ही ट्रेन फक्त दिवा स्थानकापर्यंतच धावते. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना दिव्यापर्यंत प्रवास करून पुढे ट्रेन पकडावी लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुद्द्यावर आवाज उठवला होता.
दरम्यान, शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यांनी रत्नागिरी–दादर किंवा सीएसएमटीपर्यंत ही सेवा सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे मांडली. मात्र, ही मागणी मान्य करणे शक्य नसल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे रत्नागिरी–दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत पुन्हा सुरू होण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
याशिवाय, भविष्यात कोकणात जाणाऱ्या रेल्वे मार्गातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची रत्नागिरी–दिवा पॅसेंजर ट्रेन भविष्यात पश्चिम रेल्वेमार्गावरून वसईपर्यंत जाईल आणि तेथून पनवेलमार्गे कोकणात प्रवेश करेल.
नव्या रेल्वेमार्गाचे काम पुढील दीड ते दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यानंतर कोकणात जाणाऱ्या बहुतांश एक्स्प्रेस गाड्या याच नव्या मार्गावरून धावतील. त्यामुळे प्रवासाच्या सवयींमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या विषयात राजकारण न आणता नवीन मार्गाच्या विकासाला सहकार्य करण्याचे आवाहनही खासदार रवींद्र वायकर यांनी केले आहे.




