खेड : आनंदाचे क्षण काही क्षणांतच दुःखाच्या महासागरात बदलू शकतात, याची प्रचिती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरालगतच्या जगबुडी नदीपात्रात बुधवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेतून आली. मुंबईहून सुट्टीसाठी नातेवाईकांकडे आलेल्या तीन सख्ख्या भावंडांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
आकाश रामा कांबळे (२३), नरेश रामा कांबळे (२२) आणि कैलास रामा कांबळे (१७) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे मुंबईतील चेंबूर येथील मुकुंदनगर परिसरातील रहिवासी होते. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी ते खेड शहरातील एकविरानगर येथे राहणारे त्यांचे काका अनिल दगडू कांबळे आणि काकू पूजा कांबळे यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते.
बुधवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास आकाश, नरेश, कैलास आणि त्यांच्यासोबत गोपाळ राया कांबळे हे महाडनाक्याजवळील जगबुडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. नदीकिनारी हशा, गप्पा आणि पोहण्याचा आनंद सुरू असतानाच काही वेळात परिस्थितीने अचानक भीषण वळण घेतले.
नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास तिघांपैकी एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी उर्वरित दोघेही तत्काळ मदतीला धावले. मात्र एका जीवाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिन्ही तरुण खोल पाण्यात अडकले आणि काही क्षणांतच जगबुडीच्या पाण्याने त्यांना कायमचे कवेत घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत असलेले काका अनिल कांबळे आणि मोठे बंधू गोपाळ कांबळे यांनी त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र नदीच्या खोल पाण्यापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
एका क्षणात तीन तरुण मुलांचे आयुष्य संपुष्टात आल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुट्टीतील आनंद साजरा करण्यासाठी आलेल्या या भावंडांचा दुर्दैवी अंत झाल्याने खेड शहरासह संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.
या घटनेमुळे पावसाळ्यात नदी, तलाव आणि धरण परिसरात पोहताना योग्य खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.







