मालवण (प्रतिनिधी) :
समाजातील अज्ञान, भीती आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदू बाबा नागरिकांची फसवणूक करतात. अशा शोषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा लागू केला असून, नागरिकांनी हा कायदा समजून घेत स्वतःमध्ये विवेक जागृत करून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असे प्रतिपादन श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळाचे सचिव योगेश पाटील यांनी केले.
सामाजिक न्यायभवन विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व उच्चाटन’ या योजनेअंतर्गत भ. ता. च. म. मा. विद्यालय, चौके येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रसिका गोसावी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी मार्गदर्शन करत भोंदू बाबांकडून तथाकथित चमत्कारांच्या नावाखाली केली जाणारी हातचलाखी आणि फसवणूक यांची प्रात्यक्षिकांसह उकल केली. संतांच्या दाखल्यांसह त्यांनी वैज्ञानिक विचार मांडत, गावात कोणी भोंदू बाबा चमत्कारांच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करत असल्यास त्याची तक्रार तातडीने पोलिसांकडे करावी, असे आवाहन केले.
योगेश वराडकर यांनीही विविध प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विचारसरणीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी योगेश पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना अंधश्रद्धा निर्मूलनाची शपथ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तप्रसाद परुळेकर यांनी केले, तर विजय डगला यांनी आभार मानले.
यावेळी मुख्याध्यापिका रसिका गोसावी, योगेश वराडकर, दत्तप्रसाद परुळेकर, नागेश गिरकर, संगिता जाधव, दुर्वा वारंग, अक्षता सोनवडेकर, अनिल आचरेकर, विजय डगला, भूषण अहिराव, सचिन शिंदे तसेच शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





