दोडामार्ग (प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ अभियानाला गुरुवारी दोडामार्ग शहरातून प्रारंभ करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांना सद्बुद्धी मिळावी, या उद्देशाने हा सत्याग्रह राबविण्यात येत असल्याचे काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या अभियानाअंतर्गत भजन, रामकथावाचन आणि पसायदान अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हा सत्याग्रह मंगळवार, १४ जुलैपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
सत्याग्रहाची सुरुवात दोडामार्ग येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर गणेश मंदिर परिसरातून टाळ, मृदुंग आणि हार्मोनियमच्या साथीने ‘रघुपती राघव राजाराम’ या भजनाचे गायन करत प्रभू श्रीरामांच्या नामाचा जयघोष करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक, जिल्हा सचिव सुभाष दळवी, तालुकाध्यक्ष बाबू गवस, सेवादल जिल्हाध्यक्ष अजिंक्य गावडे, जेम्स फर्नांडिस, सुधीर गवस, सोनू गवस, सुधीर चांदेरकर, दीनानाथ उगवेकर, मोहन गवस, विजय हेरेकर, देवानंद हजारे, श्रीकृष्ण गवस, मदन सावंत, संदीप नाईक, तुकाराम नाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






