ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांचे निधन
दै. रत्नागिरी टाइम्सचे देवगड प्रतिनिधी
पत्रकारिता, समाजकारण आणि जनप्रश्नांसाठी ३५ वर्षांची अखंड धडपड
देवगड (प्रतिनिधी) : दै. रत्नागिरी टाइम्सचे देवगड तालुका प्रतिनिधी, देवगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार दयानंद यशवंत मांगले (वय ५८) यांचे सोमवारी (दि. १३ जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास चिपळूण येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात आली. देवगड तालुक्याने जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा संवेदनशील आणि निर्भीड पत्रकार गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
२८ मार्च १९६८ रोजी जन्मलेल्या दयानंद मांगले यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच पत्रकारितेची वाट निवडली. सलग ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी दै. रत्नागिरी टाइम्सच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील विविध सामाजिक, विकासात्मक आणि लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून अनेकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
दै. रत्नागिरी टाइम्सच्या सिंधुदुर्ग आवृत्तीत त्यांनी ‘देवगडच्या दीपगृहावरून’ या सदरातून तालुक्यातील विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण आणि परखड लेखन केले. त्यांच्या लेखणीने अनेक प्रश्नांना दिशा मिळाली, तर प्रशासनालाही वेळोवेळी दखल घ्यावी लागली. मनमिळावू, परोपकारी आणि सदैव हसतमुख असलेल्या दयानंद मांगले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात विश्वासार्ह स्थान निर्माण केले होते.
विद्यार्थीदशेत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. काही काळ राजकीय क्षेत्रातही त्यांचा सक्रिय वावर होता. मात्र, पत्रकार म्हणून त्यांनी नेहमीच निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताची भूमिका घेतली. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते.
पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे ६ जानेवारी २०२६ रोजी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, देवगड तालुका पत्रकार समितीतर्फे ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, हिंदी मराठी पत्रकार संघाचा दर्पण रत्न पुरस्कार, ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचा प्रेरणा पुरस्कार (२०२५), एडी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार (२०२६), तसेच ब्ल्यू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, पंढरपूर यांचा राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार आणि श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था, इचलकरंजी यांचा राज्यस्तरीय श्रमशक्ती ग्लोबल अवॉर्ड यांसह अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता.
गरजूंच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारा स्वभाव, सर्वांशी जपलेले आपुलकीचे संबंध आणि समाजाशी असलेली नाळ यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने केवळ पत्रकारितेचेच नव्हे, तर सामाजिक क्षेत्राचेही मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दयानंद मांगले यांच्यावर सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पुतणे, पुतणी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. देवगडमधील ज्येष्ठ व्यापारी नेमीनाथ मांगले यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.







