लोकसंख्या स्थिरतेसाठी शिक्षण, आरोग्य आणि जनजागृतीची गरज; डॉ. उज्वला सामंत यांचे प्रतिपादन
मालवण | प्रतिनिधी
वाढती लोकसंख्या आणि त्याचे सामाजिक-आर्थिक परिणाम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग कला, वाणिज्य व देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग आणि व्यावसायिक अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन विविध जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कुटुंब नियोजन, आरोग्य जागरूकता आणि शाश्वत विकास या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. व्ही. हरगिले होते. प्रारंभी व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून लोकसंख्या नियंत्रण आणि जनजागृतीमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रमुख वक्त्या डॉ. उज्वला सामंत यांनी “लोकसंख्या वाढ आणि तिचे परिणाम तसेच लोकसंख्या नियंत्रणाची आवश्यकता” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती आणि वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, दारिद्र्य, शिक्षण, आरोग्य, निवास, अन्नसुरक्षा तसेच पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे त्यांनी विश्लेषण केले. कुटुंब नियोजन, महिलांचे शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, दर्जेदार आरोग्य सेवा आणि प्रभावी जनजागृतीच्या माध्यमातून लोकसंख्या स्थिरतेचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून विषयासंदर्भातील शंकांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमास डॉ. संग्राम पवार, डॉ. संकेत बेळेकर, विज्ञान शाखेतील प्राध्यापक, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मिसबा काझी हिने केले, तर गौतम मानवर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरती सामंत, तन्वी साळकर, मयुरेश, मितेश आणि विनीत यांनी विशेष परिश्रम घेतले.







