मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात सुमारे १५० कोटी रुपयांची नवी गुंतवणूक होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात २२ एकर जागेवर अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मत्स्य विकास व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली.
या प्रकल्पासंदर्भात **एम. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि.**च्या प्रतिनिधींसोबत महाराष्ट्र सागरी मंडळात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्रातील प्रस्तावित जहाजबांधणी प्रकल्प, इलेक्ट्रिक प्रवासी जहाज निर्मिती आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘मेक इन इंडिया‘ उपक्रमांतर्गत या प्रकल्पातून अत्याधुनिक इलेक्ट्रिक प्रवासी जहाजांचे स्वदेशी उत्पादन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सशक्त नील अर्थव्यवस्था (Blue Economy) संकल्पनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
या गुंतवणुकीमुळे केवळ सिंधुदुर्गच नव्हे, तर संपूर्ण कोकण प्रदेशात औद्योगिक विकासाला गती मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच धोरणात्मक आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.




