नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडून ६,६०० रुपयांचा दंड; शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी जनजागृतीलाही वेग
मालवण (प्रतिनिधी) : पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ शहराच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेने सिंगल युज प्लास्टिक (Single Use Plastic – SUP) विरोधात विशेष तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला. या मोहिमेत शहरातील विविध व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण ६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या विशेष मोहिमेदरम्यान शहरातील भाजी मार्केट, फळ विक्रेते, किराणा दुकाने तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांची सखोल तपासणी करण्यात आली. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या व इतर प्रतिबंधित साहित्याचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर महाराष्ट्र प्लास्टिक बंदी नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. यासोबतच व्यापाऱ्यांना पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
ही मोहीम मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी आणि स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. नगरपरिषदेचे मुकादम, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग घेत तपासणीबरोबरच जनजागृतीचे काम केले.
प्लास्टिकमुळे पर्यावरण, सागरी जीवसृष्टी आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी नागरिकांना सांगण्यात आले. कापडी पिशव्या, कागदी पिशव्या आणि इतर पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन व्यापारी आणि ग्राहकांना करण्यात आले.
मालवण शहर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने अशा विशेष तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व व्यापारी व नागरिकांनी प्लास्टिक बंदी नियमांचे पालन करून पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.







