मालवण (प्रतिनिधी) :
मालवण ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. या प्रश्नाची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली चव्हाण आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांची नियुक्ती केली आहे.
आमदार निलेश राणे यांनी नुकतीच सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा सादर केला होता. दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देणाऱ्या मालवण शहरातील ग्रामीण रुग्णालयाची अपुरी सुविधा त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन आवश्यक मनुष्यबळ व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
या मागणीची तातडीने दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी डॉ. वैशाली चव्हाण (बालरोगतज्ज्ञ) आणि डॉ. प्रशांत बागडे (स्त्रीरोगतज्ज्ञ) यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे महिला, बालक आणि स्थानिक नागरिकांसह मालवणला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, अनेक वर्षांपासून भासत असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.







