मालवण | प्रतिनिधी
जागतिक कागदी पिशव्या दिनाचे औचित्य साधत मालवण-भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरात मुलांसाठी कागदी पिशव्या व लखोटे तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात प्रशिक्षक चंद्रशेखर कोचरेकर यांनी मुलांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले तसेच त्यांच्या पर्यावरणीय महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले.
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणास निर्माण होणारे गंभीर धोके लक्षात घेऊन पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करण्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. प्लास्टिकच्या पिशव्या नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो, त्यामुळे जमीन, जलस्रोत आणि सागरी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. त्याउलट कागदी पिशव्या पुनर्वापरयोग्य, सहज विघटनशील आणि पर्यावरणपूरक असल्याने त्यांचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे कोचरेकर यांनी सांगितले.
दैनंदिन खरेदी करताना प्रत्येकाने प्लास्टिकऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याची सवय लावली तर पर्यावरण संरक्षणाला मोठी मदत होईल, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रशिक्षण उपक्रमास मानसी दुधवडकर, साक्षी सावंत यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाची जाणीव लहान वयातच मुलांमध्ये रुजविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.







