मालवण (प्रतिनिधी) :
कोकणातील पारंपरिक दशावतार कलेतील कलाकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत विधानसभेत प्रभावीपणे आवाज उठविल्याबद्दल आमदार मा. निलेशजी राणे यांचा सिंधुदुर्गातील बहुसंख्य दशावतार कलाकारांच्या उपस्थितीत कृतज्ञता सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कलाकारांनी आमदार राणे यांनी लोककलेच्या प्रश्नांना दिलेल्या प्राधान्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी दशावतार कलाकारांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मा. दत्ताजी सामंत यांच्याप्रतीही कलाकारांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची उपस्थितांनी दखल घेत त्यांचा गौरव केला.
दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्री मा. आशिष शेलार यांनी दशावतार कलाकारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल, ते कोकण दौऱ्यावर आल्यानंतर सर्व कलाकारांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येईल, असा निर्णय आमदार मा. निलेशजी राणे यांनी यावेळी जाहीर केला. या निर्णयाचे उपस्थित कलाकारांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.






