मालवणात उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ; प्रत्यक्ष अनुभवातून पर्यावरण शिक्षणावर भर
मालवण | प्रतिनिधी
मोबाईल, डिजिटल साधने आणि बंदिस्त जीवनशैलीमुळे निसर्गापासून दूर जात असलेल्या नव्या पिढीला पुन्हा हिरवाईच्या सान्निध्यात आणण्याचा अभिनव प्रयत्न म्हणून मालवणमध्ये ‘निसर्गशाळा’ या उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात रविवारी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात झाली. यूथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्गाचे प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण दिले जाणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षाला पाणी अर्पण करून करण्यात आली. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी, त्यांचे पालक, निसर्गशाळेचे माजी विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यूथ बिट्स फॉर क्लायमेटच्या अध्यक्षा मेगल डिसोजा यांनी मानव हा निसर्गाचाच अविभाज्य घटक असल्याने त्याचे जतन आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी निसर्गशाळा हा काळाची गरज असलेला समाजोपयोगी उपक्रम असल्याचे नमूद केले. महाविद्यालय आणि यूथ बिट्स फॉर क्लायमेट यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे या उपक्रमाला महाविद्यालयाचे सर्वतोपरी सहकार्य मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
निसर्गशाळेच्या शिक्षिका दुर्गा तिघले यांनी उपक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना पाणथळ जागा, जमिनीचे प्रकार, वनस्पती व बियांची ओळख, पक्षीनिरीक्षण, वन्यजीवांचा अधिवास, कातळसडा आणि जैवविविधता अशा विविध विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निसर्गात घेऊन केला जाणार असल्याची माहिती दिली. शिक्षक स्वप्निल गोसावी यांनी संवादात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी जिज्ञासा निर्माण करत प्रश्नांच्या माध्यमातून निसर्ग समजून घेण्याची प्रक्रिया या शाळेत राबविली जात असल्याचे सांगितले.
यावेळी निसर्ग व वन्यजीव अभ्यासक डॉ. श्रीकृष्ण मगदूम आणि हिमांशू लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी केलेल्या निसर्गभ्रमंती, अभ्यासदौरे आणि विविध पर्यावरणीय उपक्रमांची निवडक छायाचित्रे पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आली. सूत्रसंचालन कमल बांदकर यांनी केले. प्रशिक्षित टीमच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित वातावरणात मुलांना निसर्गाचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती त्यांनी पालकांना दिली. आभार चारुशीला देऊलकर यांनी मानले.
निसर्ग संवर्धनाबरोबरच निरीक्षणशक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरणाबद्दलची जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा ‘निसर्गशाळा’ हा उपक्रम मालवणमध्ये पर्यावरण शिक्षणाची प्रभावी चळवळ ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.







