मालवण (प्रतिनिधी)
मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार, कष्टकरी, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक यांसह विविध लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यावर शासनाकडून सकारात्मक निर्णय मिळवून दिल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केला. मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सामंत यांनी सांगितले की, जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हा प्रश्न आमदार निलेश राणे यांनी सभागृहात मांडल्यानंतर कृषिमंत्र्यांनी अवघ्या १२ तासांत निर्णय घेत प्रति हेक्टर साडेबावीस हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली. याशिवाय पीक विम्याची रक्कम स्वतंत्रपणे मिळणार असून पुरवणी यादीत आणखी विशेष मदत पॅकेज देण्याचेही शासनाने मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.
पारंपरिक व व्यावसायिक मच्छीमारांच्या डिझेल कोट्याचा प्रश्नही आमदार राणे यांनी अधिवेशनात उपस्थित केला. महाराष्ट्रातील कमी डिझेल कोटा, वाढते इंधन दर आणि परताव्यातील तफावत शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सामंत यांनी नमूद केले.
सिंधुदुर्गासह राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या उपक्रमाविरोधात सर्वसामान्य नागरिकांच्या भावना सभागृहात मांडल्यामुळे या योजनेच्या सक्तीला सध्या स्थगिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे, डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, नव्या वैद्यकीय महाविद्यालयाशी समन्वय, तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीचे प्रश्नही आमदार राणे यांनी अधिवेशनात उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून चौके, कट्टा आणि सुकळवाड येथील प्रवासी निवारा शेडसाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
यावेळी विरोधकांवर टीका करत दत्ता सामंत म्हणाले, काही विरोधी नेते केवळ पत्रकार परिषदांमधून महायुती सरकार आणि राणे कुटुंबावर टीका करतात. मात्र लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडणे हेच त्यांचे कर्तव्य आहे. आमदार निलेश राणे यांनी ते काम करून दाखविले असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मच्छीमार त्यांच्या कामाचे कौतुक करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे हे समन्वयाने कार्य करत असल्याचे सांगत महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले.



