मालवण (प्रतिनिधी)
मालवण (प्रतिनिधी) : ५८ महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय संयुक्त राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) प्रशिक्षण शिबिराचा शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३७० एनसीसी कॅडेट्सनी या शिबिरात सहभाग घेत विविध लष्करी प्रशिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे आत्मसात केले.
या शिबिरामध्ये कंबाइंड अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प (CATC), रिपब्लिक डे कॅम्प (RDC) आणि थल सैनिक कॅम्प (TSC) या तीन महत्त्वाच्या प्रशिक्षणांचे एकत्रित आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कॅडेट्सना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या प्रगत प्रशिक्षणाचा लाभ मिळाला. दहा दिवस चाललेल्या या शिबिरात ड्रिल, शस्त्र हाताळणी, फायरिंग, नकाशा वाचन, फिल्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास, योग, शारीरिक तंदुरुस्ती, साहसी उपक्रम तसेच राष्ट्रभक्तीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिस्त, संघभावना आणि देशसेवेची प्रेरणा देणारे हे शिबीर कॅडेट्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरले.
शिबिराचे नेतृत्व कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज यांनी सक्षम, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने केले. त्यांना ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार मेजर कुलदीपकर सुधाकर, आर्मीचे जवान प्रदीप पाटील, इतर प्रशिक्षित जवान तसेच बटालियनमधील अधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन स्टाफ यांचे सहकार्य लाभले. विविध महाविद्यालयांतील असोसिएट एनसीसी ऑफिसर्सना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. लेफ्टनंट प्रा. डी. मल्लेश खोत (सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण), एएनओ गुरव (कणकवली), एएनओ पावरी मॅडम आणि एएनओ गावित मॅडम यांनी सोपविण्यात आलेल्या विभागांचे प्रभावी नियोजन करून शिबिराच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
समारोप कार्यक्रमात शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सचा गौरव करण्यात आला. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रशिक्षण सत्रांमध्ये कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. राष्ट्रीय एकात्मता, शिस्त आणि देशसेवेची भावना अधिक दृढ करणारे हे शिबीर यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सहभागी कॅडेट्स व अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आगामी काळात अशा शिबिरांसाठी अधिक सक्षम आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. प्रशिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था, शौचालये, शुद्ध पिण्याचे पाणी तसेच कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. सिंधुदुर्गसारख्या सीमावर्ती व सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यात एनसीसी प्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधा उभारण्यासाठी शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत लेफ्टनंट प्रा. डी. मल्लेश खोत यांनी व्यक्त केले.







