मालवण | प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार मानले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय झाल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला न्याय मिळाल्याची भावना यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला गती मिळाली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला. १५ ते २० वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असून, हे ऋण कर्मचारी कधीही विसरणार नाहीत, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि महायुती सरकारचे आभार मानले.
भेटीदरम्यान आमदार निलेश राणे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून उपस्थित कर्मचाऱ्यांचा थेट संवाद घडवून आणला. यामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमदिप पाताडे, अजित सावंत, दिनार पडते, रश्मी सोहनी, सचिन परब, मनोज मालाडकर, डॉ. अनिरुद्ध मेहंदळे, भारती सावंत, रेश्मा पटेल, स्नेहा सावंत, स्वाती जळवी, क्रांती तोरसकर, सायली नाईक, शीतल खरात, रेश्मा मयेकर, गीतांजली पालव, ज्योती मराळ, सुविधा प्रभू, वेंगुर्लेकर, मूननकर, लीना आल्मेडा तसेच अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.







