मालवण, दि. (प्रतिनिधी) :
मालवण शहरात मोकाट गाई-गुरांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येवर तातडीने प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन मालवण नगरपरिषद कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना देण्यात आला.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट गाई-गुरे फिरत असल्याने नागरिक, व्यापारी आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यात रस्ते व दुकानांसमोर जनावरांकडून होणाऱ्या घाणीमुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, भररस्त्यात बसणाऱ्या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढत असल्याची बाबही निवेदनात मांडण्यात आली.
मालवण हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून शहरातील अस्वच्छता आणि मोकाट जनावरांमुळे पर्यटकांमध्ये शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोपही करण्यात आला. ही समस्या अनेक दिवसांपासून कायम असतानाही नगरपरिषद प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना झालेली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
शहरातील सर्व मोकाट जनावरे पकडून त्यांची कोंडवाड्यात किंवा सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. तसेच आपली गाई-गुरे मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कडक दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी ठाकरे शिवसेनेने केली.
यावेळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना, मोकाट जनावरे पकडण्यासाठीची जुनी निविदा संपल्याने मोहीम काही काळ थांबली होती. नव्या निविदेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती मंजूर होताच शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या निवेदनावर ए. एन. कारेकर, रघुनाथ राणे, प्रसाद धारगळकर, मेघा सावंत, रेश्मा सशिधरन, अशोक परब, निकिता चव्हाण, गणेश कुडाळकर, चिन्मय कुवळेकर, अजय मुणगेकर, समर्थ पाटील, अशोक कडू, मनस्वी शिरगावकर, कमलाकर खोत आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण चव्हाण, लक्ष्मण मेस्त्री, स्वप्नील मालवणकर, कमलाकर खोत यांच्यासह स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







