मालवण (प्रतिनिधी) : सात वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील बिळवस-भोगलेवाडी येथे एका महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी विलास तुकाराम भोगले व किशोर तुकाराम भोगले यांची सबळ पुराव्याअभावी मालवण येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणातील फिर्यादीनुसार, दि. २३ मे २०१९ रोजी फिर्यादी व तिची जाऊ या बिळवस-भोगलेवाडी येथील वादग्रस्त जमिनीची साफसफाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादीची जाऊ काही अंतरावर असताना आरोपी विलास तुकाराम भोगले व किशोर तुकाराम भोगले तेथे आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ३५२, ५०४, ५०६ सह कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी मालवण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. फकीह यांच्या न्यायालयात झाली. खटल्यातील पुरावे व साक्षींचे परीक्षण केल्यानंतर आरोपींविरुद्धचा गुन्हा सबळ पुराव्यांअभावी सिद्ध होऊ शकला नसल्याचे न्यायालयाने नमूद करत विलास तुकाराम भोगले व किशोर तुकाराम भोगले यांची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड उल्हास कुळकर्णी, ॲड प्राची कुळकर्णी आणि ॲड अमेय कुळकर्णी यांनी काम पाहिले.







