मालवण : प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्समधील मार्सेलीस बंदरात ‘मोरिया’ जहाजाच्या पोर्टहोलमधून घेतलेली ऐतिहासिक उडी ही केवळ सुटकेचा प्रयत्न नव्हता, तर ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीच्या बेड्या झुगारून देण्याची, मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याची आणि भारतीय तरुणांच्या मनात क्रांतीची ज्योत चेतवणारी अभूतपूर्व झेप होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांनी केले.
मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबई आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र, विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलीस पराक्रम स्मरण दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, जिल्हा परिषद सदस्या क्षमा हडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोज परब, उद्योजिका राधिका परब, राजन परब, पंढरीनाथ नाचणकर, पपू मुळीक, प्रभारी मुख्याध्यापिका संजना मसुरेकर, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, अर्चना कोदे, किसन दुखंडे, पत्रकार सुयोग पंडित, कांबळे सर, रमेश पाताडे, समीर नाईक, शशांक पिंगुळकर, सुनिल बांदेकर, मंदार पाटील, आर्या भोगले, विशाखा जाधव, सानिका वायंगणकर, अनिल मेस्त्री, शाहू ठुबे, श्री ठाकूर तसेच बागवे हायस्कूल, केंद्रशाळा मसुरे, देऊळवाडा हायस्कूल आणि इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका संजना मसुरेकर यांनी केले.
संस्थाध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ८ जुलै १९१० रोजी सावरकरांनी एस.एस. मोरिया जहाजातून अथांग समुद्रात घेतलेली ऐतिहासिक झेप ही अद्वितीय धैर्य, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यप्रेमाचे प्रतीक आहे. या सुवर्णक्षणाचे स्मरण विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, धैर्य आणि संकटांशी लढण्याची प्रेरणा देणारे ठरावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पत्रकार सुयोग पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी समुद्रात उडी घेतली; त्याचप्रमाणे आजच्या तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्याची उडी आपल्या जीवनात घ्यावी,” असे आवाहन केले.
कार्यक्रमात मसुरे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डी. टी. पेडणेकर यांनी केले, तर आभार कांबळे सर यांनी मानले







