सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्टाचे तसेच विविध खेळांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा साहित्याचे लोकार्पण खासदार नारायण राणे यांच्या हस्ते बुधवारी (दि. १५ जुलै) सकाळी ९.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.
सन २०२६-२७ मधील शालेय क्रीडा स्पर्धा तसेच जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सराव सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सिंथेटिक टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात आले आहे. याशिवाय कबड्डी, कुस्ती, तायक्वांदो, हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, जलतरण तसेच विविध मैदानी खेळांसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांनी मान्यता दिलेले अत्याधुनिक साहित्य जिल्हा क्रीडा संकुलाला उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या सुविधांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक असलेला सराव स्थानिक पातळीवरच करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ग्रामीण भागातील खेळाडूंनाही दर्जेदार प्रशिक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे.
लोकार्पण सोहळ्यास जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, या उपक्रमामुळे सिंधुदुर्गच्या क्रीडा विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






