कलाकारांना समाजाने आणि शासनाने अधिक बळ देण्याची गरज; मालवणातील संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगातून लोककलेच्या जतनाचा बुलंद संदेश
मालवण (प्रतिनिधी) : दशावतार ही केवळ लोककला नसून कोकणच्या संस्कृतीचा आत्मा आहे. शतकानुशतके लोकपरंपरेतून जपली गेलेली ही कला आजही अनेक कलाकार आपल्या अपार जिद्दीने आणि प्रतिकूल परिस्थितीतही जिवंत ठेवत आहेत. या कलाकारांच्या संघर्षाची समाजाने दखल घ्यावी, त्यांच्या पाठीशी शासनाने भक्कमपणे उभे राहावे आणि या लोककलेला आर्थिक व सामाजिक बळ द्यावे, असे भावनिक प्रतिपादन उद्योजक दत्ता सामंत यांनी मालवण येथे आयोजित संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
दशावतार कला आणि कलाकारप्रेमी मालवण, मालवणी जत्रा आणि संयुक्त दशावतार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शिव अजमिढ संग्राम’ अर्थात ‘अजमिढ शरसेतू’ या संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाला रविवारी दैवज्ञ भवन हॉलमध्ये नाट्यरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक दशावतारातील प्रभावी अभिनय, भारदस्त संवादफेक, नेत्रदीपक रंगभूषा, देखणी वेशभूषा आणि सुरेल संगीताच्या साथीने रंगलेल्या या प्रयोगाने प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक प्रवेशाला मिळालेला टाळ्यांचा कडकडाट हा दशावताराबद्दलच्या लोकांच्या प्रेमाची साक्ष देणारा ठरला.
यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी, दशावतार ही कोकणची सांस्कृतिक ओळख असून या कलेचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. कलाकारांना केवळ कौतुकाची थाप नव्हे, तर आर्थिक स्थैर्य मिळणेही तितकेच आवश्यक आहे. भविष्यात दर्जेदार संयुक्त दशावतार प्रयोग तिकीट पद्धतीने सादर करून कलाकारांना योग्य मानधन मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य संयुक्त दशावतार आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात दशावतारी लोककलावंतांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे निर्भीड पत्रकार मनोज चव्हाण, नाट्य अभिनेत्री शुभदा सचिन टिकम, तबला विशारद सुधीर मच्छींद्रनाथ गोसावी आणि संगीत अलंकार दिलीप प्रभाकर ठाकुर यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. लोककलेसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा या कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले विनायक कोळंबकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सुहास (मामा) माळकर यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. “मामा माळकर ही केवळ व्यक्ती नसून दशावतारासाठी आयुष्य वाहिलेली एक चळवळ आहे,” अशा शब्दांत त्यांनी मामा माळकर यांच्या अविरत कार्याला सलाम केला. दशावताराच्या जतनासाठी अनेक कलाकारांना एकत्र आणण्याचे आणि संयुक्त प्रयोगांची संकल्पना रुजविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी व्यासपीठावर उद्योजक दत्ता सामंत, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, उद्योजक संजय गावडे, ॲड दिलीप ठाकुर, ॲड समृद्धी आसोलकर, कलाप्रेमी प्रदीप वेंगुर्लेकर, बुवा भालचंद्र केळुसकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक कोळंबकर, बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळाचे मालक मामा माळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक रुपेश नेवगी यांनी केले, सूत्रसंचालन प्रभूदास आजगावकर यांनी केले, तर आभार बलवंत सामंत यांनी मानले. सत्काराला उत्तर देताना ॲड दिलीप ठाकुर आणि शुभदा टिकम यांनी दशावतार संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.
नाट्यप्रयोगात दत्तप्रसाद शेणई, सुहास (मामा) माळकर, बाबा मयेकर, मोरेश्वर सावंत, नीलकंठ सावंत, सागर गावकर, महेंद्र कुडव, उदय मोर्ये, चारुहास मांजरेकर, प्रशांत मयेकर, सुयश ठाकुर, शिवा मेस्त्री आणि प्रथमेश सामंत यांनी प्रभावी अभिनय साकारत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हार्मोनियमवर गुणाजी घाडीगावकर, मृदंगमणी किसन नेमळेकर आणि तालरक्षक हरेश नेमळेकर यांच्या सुरेल साथसंगतीने नाट्यप्रयोगाची रंगत अधिक खुलली.
संयुक्त दशावताराच्या माध्यमातून विविध मंडळांतील कलाकार एकाच रंगमंचावर येत आहेत, ही बाब कोकणच्या लोककलेसाठी आशादायी ठरत आहे. बदलत्या काळात लोककलेसमोर अनेक आव्हाने उभी असली, तरी अशा उपक्रमांमुळे दशावताराला नवी ऊर्जा, नवे प्रेक्षक आणि नव्या पिढीचा विश्वास मिळत असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ, कोळंब यांचे विशेष सहकार्य लाभले.







