मालवण (प्रतिनिधी)
गेले काही दिवस उष्मा वाढल्याने नागरिक त्रस्त बनले असतानाच आज सकाळी मालवण शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. मालवण शहर आणि परिसरात काही काळ सकाळीच पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिक व्यापारी आणि व्यवसायिकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे आंबा आणि काजू बागांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसापासून सिंधुदुर्गसह कोकणात उष्मा वाढल्याचे चित्र आहे. सकाळपासून या उष्म्याची झळ सर्वांना सोसावी लागत आहे. आज पहाटेपासूनच आभाळात काळ्याकुट्ट ढगानी गर्दी करण्यात सुरुवात केल्याने मेघराजाचे आगमन होणार याची कल्पना मालवण शहर आणि परिसरातील नागरिकांना आली होती सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाच्या धारा कोसळून लागल्या. अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिक चिंताग्रस्त बनले. मात्र काही वेळातच हा पाऊस बंद झाला. या पावसामुळे काही काळ हवेत गारवा निर्मण झाल्यानंतर पुन्हा उष्मा वाढला. या पावसामुळे आंबा व काजू बागायतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बागायतदार व शेतकरी चिंताग्रस्त असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.







