चिपळूण: लोटे औद्योगिक वसाहतीत उभ्या राहत असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात गुरुवार, दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना दलवाई म्हणाले की, इटलीतील ‘मिटेनी’ ही कंपनी मोठ्या प्रमाणावरील प्रदूषणामुळे बंद पाडण्यात आली होती. त्या कंपनीची संपूर्ण यंत्रसामग्री जशीच्या तशी कोकणात आणण्यात आली असून ती लक्ष्मी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मिटेनी कंपनीचे माजी संचालक अँटोनिया नॉरडेनी यांचा लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये समावेश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दलवाई पुढे म्हणाले की, पीएफएएस (कायमचे रसायन) हे मानवी आरोग्यास अत्यंत घातक आहे. हे रसायन रक्तात मिसळल्यास कॅन्सर, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे व हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच प्रजनन क्षमतेवरही या रसायनांचे दुष्परिणाम होत असल्याचे विविध वैद्यकीय अहवालांतून स्पष्ट झाले आहे.
असे असतानाही या कंपनीला परवानगी देताना प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी व संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप दलवाई यांनी केला. हा प्रश्न कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून, जनतेच्या आरोग्याचा आणि भावी पिढ्यांच्या अस्तित्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्व नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला अशोक जाधव, उदय घाग, सुमती जांभेकर, भरत लब्धे, राजन इंदुलकर, संकेत साळवी, महादेव चव्हाण, सुबोध सावंत-देसाई यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



