
- कोळंबमध्ये गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचाव
- रात्री ९.१५ वाजता घडली घटना; गोळी डोक्याजवळून गेल्याने मोठा अनर्थ टळला
- घर परिसरात गोळीचे छरे; घटनास्थळी बुटांचे ठसे, पोलिसांकडून तपास सुरू
मालवण | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळंब येथे गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. गोळी संदीप शेलटकर यांच्या डोक्याच्या बाजूने गेल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र त्यांच्या घराच्या परिसरात सर्वत्र बंदुकीच्या गोळीचे छरे विखुरलेले दिसून आले.
गोळीबार झाल्यानंतर घराच्या किचन रूममध्ये, अंगणात तसेच दुचाकीवर गोळीचे छरे आढळून आले. यावरून गोळीबार अत्यंत जवळून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान गोळीबार करणारी व्यक्ती स्वप्निल शिर्सेकर समोरील कंपाऊंडच्या दिशेने धक्का देत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणाहून गोळीबार करण्यात आला त्या परिसरात बुटांचे ठसेही आढळून आले आहेत.
या घटनेबाबत संदीप शेलटकर यांनी प्रतिक्रिया देताना, “हा मला संपवण्याचा प्रयत्न होता. मात्र सुदैवाने मी यातून बचावलो. पोलिसांनी संशयितांना तात्काळ ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी,” अशी मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार झालेल्या ठिकाणाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.






