मालवण (प्रतिनिधी) : तारकर्ली येथील निशाणकाठी समुद्रकिनारी बुधवारी, दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. समुद्राच्या पाण्यात राहिल्यामुळे मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून चेहरा ओळखता येत नसल्याने मृताची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सत्यवान भगत यांनी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास समुद्रकिनारी मृतदेह आढळल्याची माहिती संबंधित व्यक्तीला दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर दुपारी सुमारे २.१५ वाजता घटनास्थळी पाहणी केली असता समुद्रकिनारी एक पुरुषाचा मृतदेह उताण्या अवस्थेत आढळून आला.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ५० वर्षे असून त्याच्या अंगात हिरवटसर रंगाचा फुलबाह्यांचा टी-शर्ट आहे. या टी-शर्टवर ‘साई संस्कृती फाउंडेशन, दहिसर पूर्व, मुंबई’ असे छापलेले आहे. मृताच्या कमरेला लाल-काळ्या रंगाचा दोरा, अंगावर काळ्या रंगाची हाफ पॅन्ट असून दोन्ही पायांमध्ये काळ्या रंगाचे धागे बांधलेले आहेत. तसेच उजव्या हातात राखी बांधलेली आहे.
समुद्राच्या पाण्यात बराच काळ राहिल्यामुळे मृतदेहाची मोठ्या प्रमाणात कुजलेली अवस्था झाली असून चेहरा ओळखता येत नाही. त्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, संबंधित व्यक्ती समुद्रात कशी आली आणि तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून मृताची ओळख पटविण्यासह मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलीस पाटील रंजन कोळंबकर यांनी पोलिसांना दिली.
प्रभारी पोलीस अधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने पुढील तपास करत आहेत.






