‘माझी वसुंधरा’ आणि स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नगरपरिषदेचा उपक्रम; १५ सप्टेंबर अर्जाची अंतिम मुदत
मालवण, दि. प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी मालवण नगरपरिषदेच्या वतीने ‘पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा–२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
मालवण नगरपरिषद हद्दीतील घरगुती गणेश सजावट गटासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेश सजावट करण्यासोबतच प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करणे आणि स्वच्छतेचा संदेश देणे, यावर स्पर्धेत विशेष भर देण्यात आला आहे.
१०० गुणांच्या आधारे परीक्षण
स्पर्धेतील सजावटीचे परीक्षण एकूण १०० गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, प्लास्टिक व थर्माकोलमुक्त सजावट, कल्पकता व नाविन्य, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा संदेश, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, जल व ऊर्जा संवर्धन, वृक्षसंवर्धन तसेच परिसर स्वच्छता या बाबींचा समावेश आहे.
विजेत्यांना रोख पारितोषिकांसह विशेष पुरस्कार
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ७ हजार ५०० रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकास २ हजार ५०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
याशिवाय उत्कृष्ट पर्यावरणपूरक सजावट, उत्कृष्ट पुनर्वापर सजावट, उत्कृष्ट स्वच्छता व कचरा व्यवस्थापन संदेश आणि उत्कृष्ट कलात्मक सजावट अशा विशेष पुरस्कारांचाही समावेश करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे आयोजन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण आणि मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
१५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. इच्छुक नागरिकांनी प्रवेश अर्जासाठी मालवण नगरपरिषदेशी संपर्क साधून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.







