सिंधुदुर्ग, दि. ९ : बालकांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण मिळावे आणि त्यांच्यामध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार श्री. भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड येथे बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ (पोक्सो) या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, पॅनल विधीज्ञ ॲड. आशपाक शेख, अधीक्षक एस. डी. गिरकर तसेच शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी ॲड. आशपाक शेख यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याच्या विविध तरतुदींची माहिती दिली. बालकांना लैंगिक अपराध, छळ, छेडछाड, अश्लीलता, अत्याचार आणि बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी तसेच अशा गुन्ह्यांतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
पोक्सो कायद्याची माहिती विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जाणून घेणे आवश्यक असून, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यासोबतच पालक व शिक्षकांनीही सजग राहणे गरजेचे आहे, असे ॲड. शेख यांनी सांगितले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘सुरक्षित स्पर्श’ आणि ‘असुरक्षित स्पर्श’ यातील फरक समजावून सांगितला. आपल्यासोबत चुकीचे काही घडल्यास ते लपवून न ठेवता विश्वासातील जवळच्या व्यक्तीला तातडीने सांगावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी विद्यार्थ्यांना नागरिकांची मूलभूत तत्त्वे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विधी सेवा व कायदेशीर सहाय्याबाबत माहिती देण्यात आली.







