पुन्हा पक्षकार्यासाठी संधी; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती
सावंतवाडी, दि. ९ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांदरम्यान पक्षशिस्तीच्या विरोधात भूमिका घेतल्याने निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन अखेर रद्द करण्यात आले आहे. संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय होऊन पक्षकार्यात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
सावंतवाडी येथे झालेल्या भाजपच्या जिल्हा विस्तार कार्यकारिणीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निलंबन मागे घेण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.
निलंबन रद्द झालेल्या प्रमुख लोकप्रतिनिधींमध्ये
- डायगो (मायकल) फ्रान्सिस डिसोजा – कोलगाव जिल्हा परिषद सदस्य
- नितीन एकनाथ राऊळ – इन्सुली जिल्हा परिषद सदस्य
- जितेंद्र पांडुरंग गावकर – माजगाव पंचायत समिती सदस्य
अन्य पदाधिकारी
सुजाता अजित पडवळ, शर्वाणी शेखर गावकर, स्वागत रघुवीर नाटेकर, योगेश अशोक केणी, उल्हास उत्तम परब, स्नेहल संदीप नेमळेकर, साक्षी संदीप नाईक, सुप्रिया शैलेश नाईक, प्रवीण नारायण गवस आणि अनिरुद्ध फाटक यांचेही निलंबन मागे घेण्यात आले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या काळात सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तीन विधानसभा मतदारसंघांतील काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर पक्षशिस्तीची कारवाई करण्यात आली होती. यातील काही उमेदवार निवडून आले, तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला.
आता निलंबन मागे घेतल्याने संबंधित पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय होण्याची संधी मिळाली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.






