डॉ. ज्योती तोरसकर यांच्या संशोधनाची दिल्लीतील राष्ट्रीय परिसंवादात दखल
मालवण, दि. १० (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गाच्या उभारणीपूर्वी ज्या स्थळी गणेशपूजन आणि सागरपूजन केले, अशी ऐतिहासिक परंपरा असलेल्या मालवण दांडी-वायरी किनाऱ्यावरील ‘मोरयाचा धोंडा’ या शिलास्थळाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. मालवणच्या इतिहास संशोधक डॉ. ज्योती बुवा-तोरसकर यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक परिसंवादात ‘मोरयाचा धोंडा’ विषयावर संशोधनपर लेख सादर केला.
सिंधुदुर्गाच्या सागरी इतिहासातील हे महत्त्वपूर्ण शिलास्थळ आजवर व्यापक ऐतिहासिक चर्चेपासून काहीसे दूर राहिले होते. मात्र, डॉ. तोरसकर यांच्या संशोधनामुळे ‘मोरयाचा धोंडा’च्या ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय पैलूंवर राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासकांसमोर चर्चा झाली. दक्षिण कोकणातून या राष्ट्रीय परिसंवादात सहभागी झालेल्या त्या एकमेव महिला संशोधक होत्या.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विशेष निमंत्रणामुळे डॉ. तोरसकर यांना दिल्लीतील या राष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठावर संशोधन सादर करण्याची संधी मिळाली.
शिवकालीन परंपरा आणि शिलाचिन्हांचा अभ्यास
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गाच्या निर्मितीपूर्वी मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या ‘मोरयाचा धोंडा’ येथे केलेले गणेशपूजन व सागरपूजन, तसेच या शिलास्थळावरील विविध शिलाचिन्हे यांचा अभ्यास डॉ. तोरसकर यांनी संशोधनातून मांडला.
या ठिकाणी आढळणारी चंद्र, सूर्य, गणेश, शिवलिंग, नंदी आणि पादुका यांसारखी शिलाचिन्हे, त्यांचे धार्मिक-सांस्कृतिक संदर्भ आणि सिंधुदुर्गासह सागरी किल्ल्यांच्या निर्मितीपूर्वी झालेल्या धार्मिक विधींचा संदर्भ ऐतिहासिक दस्तऐवज, स्थानिक परंपरा आणि स्थलसाक्ष यांच्या आधारे त्यांनी मांडला.
त्यामुळे सिंधुदुर्गाच्या इतिहासाकडे केवळ लष्करी किंवा स्थापत्याच्या दृष्टिकोनातून न पाहता धार्मिक-सांस्कृतिक आणि सागरी राज्यनिर्मितीच्या व्यापक संदर्भातून पाहण्याची नवी दिशा या संशोधनातून समोर आली आहे.
किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पाठपुराव्याचीही दखल
‘मोरयाचा धोंडा’ या ऐतिहासिक स्थळाच्या जतन, संवर्धन आणि शासकीय स्तरावरील नोंदींसाठी किल्ले प्रेरणोत्सव समितीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचीही परिसंवादात दखल घेण्यात आली.
समितीच्या प्रयत्नांमुळे या स्थळाचा सातबारा उतारा उपलब्ध होणे, शासकीय अभिलेखांमध्ये नोंद होणे आणि स्थळाला शासकीय पूजेचा मान मिळणे या बाबी विशेष उल्लेखनीय ठरल्या. ऐतिहासिक स्थळाच्या दस्तऐवजीकरणासाठी झालेल्या या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
देशभरातील अभ्यासकांकडून कौतुक
जेएनयूमध्ये झालेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमाला तंजावरचे बाबाराजे भोसले, रघुजी आंग्रे, जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित यांच्यासह देशातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, संशोधक आणि इतिहास अभ्यासक उपस्थित होते.
विविध राज्यांतून आलेल्या तज्ज्ञांसमोर ‘मोरयाचा धोंडा’चे सादरीकरण झाल्याने या स्थळाची माहिती देशभरातील अभ्यासकांपर्यंत पोहोचली. चर्चासत्राचे अध्यक्ष जेएनयूचे प्राध्यापक नवेंदु शेखर यांनी डॉ. तोरसकर यांच्या सादरीकरणासह संदर्भ साहित्याचे विशेष कौतुक केले. सादरीकरणानंतर अनेक मान्यवरांनी ‘मोरयाचा धोंडा’ प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
या संशोधनपर लेखासाठी अभ्यासपूर्ण स्लाईड तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.
सिंधुदुर्गाच्या सागरी वारशाला नवी दिशा
डॉ. ज्योती तोरसकर यांच्या दीर्घकाळच्या संशोधनामुळे मालवणच्या समुद्रकिनारी असलेला ‘मोरयाचा धोंडा’ हा केवळ स्थानिक श्रद्धेचा विषय न राहता राष्ट्रीय ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय चर्चेचा विषय बनण्याची दिशा निर्माण झाली आहे.
या संशोधनामुळे या दुर्लक्षित शिलास्थळाच्या पुढील ऐतिहासिक, पुरातत्त्वीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अभ्यासासाठी नवी दारे खुली झाली असून, सिंधुदुर्गाच्या सागरी वारशाच्या अभ्यासाला राष्ट्रीय पातळीवर नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






