मालवण : बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (ICDS मालवण) आणि पंचायत समिती मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय पोषण माह’ अंतर्गत पंचायत समिती परिसरात विविध नावीन्यपूर्ण जनजागृती उपक्रम, पोषण प्रतिज्ञा तसेच भव्य पोषण रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून तळागाळातील प्रत्येक नागरिकाचा पोषण मोहिमेत सहभाग आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास पंचायत समिती मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत-हजारे, पंचायत समिती सदस्य मानसी भोगावकर, योजना कांबळी, सीमा परुळेकर, माधुरी मसुरकर, रिया बावकर, दीपक चव्हाण, गणेश तोंडवळकर, दीपक सुर्वे, संजय ठाकूर, संतोष गावडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘कुपोषण राक्षसा’विरोधात ‘सुपोषणाची छत्री’
अंगणवाडी सेविकांनी सादर केलेले ‘जंक फूडच्या कुपोषण राक्षसा’वर पोषण मातेची सुपोषणाची छत्री’ हे अभिनव सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. सध्याच्या काळात मुलांमध्ये वाढत असलेल्या जंक फूडच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि निर्माण होणारा कुपोषणाचा धोका याचे प्रभावी चित्रण या माध्यमातून करण्यात आले.
जंक फूडमुळे निर्माण होणाऱ्या कुपोषणाच्या समस्येचे प्रतीकात्मक दर्शन ‘राक्षसा’च्या माध्यमातून घडविण्यात आले. या राक्षसापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविकेने ‘पोषण माता’ची भूमिका साकारत ‘सुपोषणाची छत्री’ धरली. योग्य आणि संतुलित आहाराच्या माध्यमातून बालकांना कुपोषणापासून दूर ठेवता येते, असा प्रभावी संदेश या सादरीकरणातून देण्यात आला. या कल्पक उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत-हजारे यांनी ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पोषण माहमधील विविध उपक्रमांची सविस्तर कार्यरूपरेषा मांडली. पोषण, संतुलित आहार, बालकांचे आरोग्य आणि कुपोषण निर्मूलन याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अंगणवाडी केंद्रे ही केवळ बालकांच्या संगोपनाची केंद्रे नसून समाजाच्या पोषणविषयक जाणीवा मजबूत करणारे महत्त्वाचे माध्यम आहेत. त्यामुळे ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या भावनेतून नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश पोषण रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.







