उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे निवेदन; आठवडाभरात सुविधा सुरू करण्याचे आश्वासन
Abid Naik urges Deputy CM Sunetra Pawar to restart free CT scan services at Kankavli and Sawantwadi hospitals, offering relief to poor patients.
कणकवली, दि. ८ सप्टेंबर (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमधील बंद झालेली मोफत सिटीस्कॅन सुविधा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करून आठवडाभरात सिटीस्कॅन सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिल्याचे नाईक यांनी सांगितले.
गोवा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अबिद नाईक यांनी भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन दिले.
कणकवली, सावंतवाडीत मोफत सिटीस्कॅन सुविधा बंद
निवेदनानुसार, कणकवली आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड या कंपनीमार्फत मागील वर्षभरापासून मोफत सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध होती. या सुविधेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मोठा फायदा होत होता.
मात्र आरोग्य विभागाकडून संबंधित कंपनीला एक्स-रे, सिटीस्कॅन, एमआरआय यांसह राज्यभर पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांपोटी सुमारे ५६ कोटी रुपये देय असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या थकीत देयकांमुळे कंपनीने सिंधुदुर्गातील कणकवली आणि सावंतवाडी येथील मोफत सिटीस्कॅन सेवा बंद केल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.
गोरगरीब रुग्णांवर आर्थिक भुर्दंड
मोफत सिटीस्कॅन सुविधा बंद झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना खासगी केंद्रांमध्ये तपासणीसाठी आर्थिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी अबिद नाईक यांनी केली.
कंपनीला काही थकीत रक्कम अदा करण्याबाबत आरोग्य विभागाशी चर्चा करून कार्यवाही झाल्यास कणकवली आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांतील मोफत सिटीस्कॅन सुविधा पुन्हा सुरू होण्यास मदत होईल, असे नाईक यांनी निवेदनात नमूद केले.
पालकमंत्र्यांनीही आरोग्यमंत्र्यांना दिले पत्र
या संदर्भात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही आरोग्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याचे अबिद नाईक यांनी सांगितले. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कणकवली आणि सावंतवाडी येथील सिटीस्कॅन सुविधा पुन्हा सुरू झाल्यास जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.






