मालवण, दि. ९ (प्रतिनिधी) : मालवण शहरातील धुरीवाडा येथील कासवकर बालोद्यान परिसराच्या बाजूला असलेला वीज खांब धोकादायक स्थितीत कलंडला असून, सध्या एका माडाच्या झाडाच्या आधारावर उभा आहे. या खांबावरील वीजवाहिन्या माडाच्या झाडाला टेकल्याने परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने तात्काळ या धोकादायक खांबाची दुरुस्ती करून तो योग्य स्थितीत करावा अथवा नवीन खांब उभारावा, अशी मागणी मालवणच्या नगरसेविका दर्शना कासवकर यांनी केली आहे.
कासवकर बालोद्यान परिसरातील ट्रान्सफॉर्मरमधून जाणाऱ्या तीन फेजपैकी सध्या केवळ एका फेजवर वीजपुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत मालवण शहर वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेविका कासवकर यांनी केला आहे.
गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर चिंता
वीज वितरण विभागाच्या या कथित गलथान कारभाराचा फटका वीज ग्राहकांना बसत असून, गणेशोत्सवाच्या काळात परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याची किंवा कमी दाबाने वीजपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी वीज वितरण विभागाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी कासवकर यांनी केली.
दरम्यान, वीज वितरण विभागाने तातडीने समस्या दूर न केल्यास पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्यात येणार असल्याचे नगरसेविका दर्शना कासवकर यांनी सांगितले.





