मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील वायंगणी येथील सौ. अंतरा हर्षद दुखंडे या विवाहितेच्या संशयास्पद मृत्युच्या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले तरी पोलीस तपासाबाबत कोणीतीही माहिती समोर न आल्याने काल वायंगणी गावातील महिलांनी योग्य तपास न झाल्यास महिला दिनावर तसेच त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीत होणाऱ्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर आज वायंगणी ग्रामपंचायतीत महिला दिनानिमित्त आयोजित महिलांसाठी विशेष ग्रामसभेवर वायंगणीतील महिलांनी बहिष्कार टाकल्याने एकही महिला या सभेस उपस्थित राहिली नाही.
काल वायंगणी गावातील महिलांनी मालवण पोलीस ठाण्यात धडक देत अंतरा दुखंडे मृत्यू प्रकरणाच्या पोलीस तपासाचे काय झाले ? असा जाब विचारत अंतरा दुखंडे मृत्यू प्रकारणाचा तपास तातडीने, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा, मृत्यू मागील सत्य परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे, यामध्ये कोणी दोषी असल्यास त्याला शिक्षा व्हावी अशा मागण्या पोलिसांकडे केल्या. तसेच समाधानकारक तपास न झाल्यास महिला व ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल. एका मृत महिलेला न्याय मिळत नसेल तर ८ मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनावर तसेच वायंगणी गावच्या ग्रामसभेवर गावातील महिला बहिष्कार टाकतील, असा इशारा उपस्थित महिलांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन निमित्त शासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वायंगणी मार्फत महिलांसाठी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र अंतरा दुखंडे हिच्या मृत्यूच्या तपासाबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात न आल्याने पोलीस यंत्रणा व शासनाच्या निषेधार्थ महिलांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. या सभेला गावातील एकही महिला उपस्थित राहिली नाही, त्यामुळे सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. केवळ सरपंच व ग्रामसेवक सभागृहात उपस्थित होते. अंतरा दुखंडे हिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नाही, पोलीस तपासाबाबत माहिती मिळत नाही तोपर्यंत शासनाच्या महिला सबलीकरण विषयक कोणत्याही कार्यक्रमात वायंगणी गावातील महिला सहभागी होणार नाही, असा इशारा महिलांनी दिला आहे.






