विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश; चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभाची शक्यता
मुंबई, दि. ९ : शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गुणांकनात क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव तातडीने तयार करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
शालेय क्रीडा प्रकारातील ४४ खेळांना क्रीडा गुणांची सवलत देण्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांना ही कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
खेळातून व्यक्तिमत्त्व विकासासह निरोगी राष्ट्रनिर्मिती
खेळांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्याचबरोबर सुदृढ आणि निरोगी राष्ट्रनिर्मितीसही हातभार लागतो. राज्यातील अनेक शाळा शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय विविध क्रीडा प्रकार आणि स्पर्धांचे आयोजन करतात. या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याची योग्य दखल घेतली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शालेय गुणांकनात क्रीडा सवलतीचे गुण देण्यासाठी संबंधित विभागांनी सकारात्मक कार्यवाही करावी, असे बनसोडे यांनी सांगितले.
चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रश्न
महाराष्ट्र राज्य शालेय खेळ क्रीडा संस्थेच्या मागणीनुसार, विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीचे चार लाखांहून अधिक विद्यार्थी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक वाव मिळावा आणि शैक्षणिक प्रगतीलाही प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रीडा सवलतीचे गुण देण्याची मागणी संस्थेने केली आहे.
बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिव रुपाली सावंत, क्रीडा संचालनालयाचे उपसंचालक नवनाथ फरताडे, क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी कुणाल सरपाते, शालेय शिक्षण विभागाचे सहायक कक्ष अधिकारी दारासिंग दुल्हत, महाराष्ट्र राज्य शालेय खेळ क्रीडा संस्थेचे अध्यक्ष शाम राजाराम भोसले, विविध विनाअनुदानित शालेय खेळांचे प्रशिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.







