मुंबई, दि. ११ : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर टप्प्याटप्प्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवपूर्व तयारी आणि गणेशमूर्तींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या ट्रक, मल्टीॲक्सल, ट्रेलर, लॉरी आदी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पूर्णतः बंदी राहणार आहे.
त्यानंतर गणेश विसर्जन आणि परतीच्या प्रवासाच्या कालावधीतही टप्प्याटप्प्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत, तर सात दिवसांच्या गणपती तसेच गौरी-गणपती विसर्जनासाठी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहील.
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत १२ दिवसांच्या गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठीही जड-अवजड वाहनांवर निर्बंध राहणार आहेत.
वाहनांची वजनक्षमता निश्चित करताना मालासह वाहनाचे एकूण वजन अर्थात टोटल ग्रॉस व्हेईकल वेट (GVW) ग्राह्य धरले जाणार आहे.
जीवनावश्यक सेवांच्या वाहनांना सूट
या निर्बंधातून जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. जेएनपीटी आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला तसेच अन्य नाशवंत आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन आणि अन्य अत्यावश्यक सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांनाही निर्बंध लागू राहणार नाहीत.
महामार्गाच्या कामातील वाहनांनाही प्रवेश
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने तसेच संबंधित साहित्य आणि मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. अशा वाहनांना संबंधित वाहतूक विभाग अथवा महामार्ग पोलिसांकडून प्रवेशपत्र देण्यात येणार आहे.
गणेशभक्तांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक तसेच महामार्गावरील परिस्थितीचा विचार करून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक परिस्थितीनुसार जड-अवजड वाहनांवरील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेऊ शकतील.
दरम्यान, जेएनपीटी आणि जयगड बंदरातून होणारी आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी आवश्यक वाहतूक नियोजन करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिले आहेत.






