कणकवली : गांजाच्या खरेदी-विक्रीसाठी टेंबवाडी परिसरात आलेल्या दोघांना कणकवली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या झडतीत १.७९८ किलो गांजा आढळून आला. गांजासह दोन दुचाकी असा सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गांगो मंदिर ते गणपती साना या मार्गावरील टेंबवाडी येथील आम्रपाली सोसायटीजवळ गांजा विक्रीचा व्यवहार होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन पोलिस पथकाने परिसरात सापळा लावला.
संशयित हालचाली दिसताच पोलिसांनी कारवाई करत सूर्यकांत राघो घाडीगावकर (२९, रा. वागदे देऊळवाडी, कणकवली) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहनांची झडती घेतल्यानंतर दोन पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरवट रंगाचा, उग्र वासाचा गांजा आढळला. वजन केल्यानंतर गांजाचे वजन १.७९८ किलो भरले.
दोन दुचाकीही पोलिसांच्या ताब्यात
कारवाईत ६० हजार रुपये किमतीचा गांजा, ८० हजार रुपये किमतीची यमाहा फॅसिनो (MH 07 AQ 4088) आणि ४० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर (KA 32 HH 1214) अशा मुद्देमालाची जप्ती करण्यात आली.
गांजाच्या व्यवहारासाठी दुचाकींचा वापर करण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, ASI डॉमीनिक डिसोझा, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गोसावी, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्सालवीस तसेच पोलिस कर्मचारी समजिस्कर आणि कांडर यांच्या पथकाचा कारवाईत सहभाग होता.






