जमिनीच्या वादातून मारहाण केल्याचा आरोप; ॲड. स्वरुप पई व ॲड. अंबरीष गावडे यांचा युक्तिवाद
मालवण, दि. प्रतिनिधी : जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आलेल्या पोईप-खालची पालववाडी येथील प्रकाश रामचंद्र पालव (वय ६४) यांची मालवण न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली. संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी न्यायालयीन काम पाहिले.
फिर्यादीनुसार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खालची पालववाडी येथील आपल्या घरात असताना त्यांचे चुलतभाऊ प्रकाश रामचंद्र पालव हे जमिनीच्या वादातून घरात जबरदस्तीने आले. यावेळी त्यांनी फिर्यादीच्या वडिलांना ढकलून दिल्याचा आरोप आहे. फिर्यादी मध्ये पडला असता संशयिताने लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर व हातावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत फिर्यादीचा हात फ्रॅक्चर झाला असून डोक्याला दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी मालवण पोलिसांनी फिर्यादीची तक्रार नोंदवून भारतीय न्याय संहितेतील कलम ११५(१), ११८(१), ११८(२), ३३३ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी प्रकाश पालव यांना ताब्यात घेतले. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, मालवण यांच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात आली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयिताला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर संशयितातर्फे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. अर्जावरील सुनावणीनंतर न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर प्रकाश पालव यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.






