सिंधुदुर्ग, दि. ९ : समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपल्या तक्रारी आणि अडचणी मांडण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे.
राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधीचा मूलभूत अधिकार दिला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेमार्फत प्रभावीपणे सोडवणूक करणे, या उद्देशाने जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. तिसरा सोमवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्यास त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येतो.
महिलांच्या तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवून त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने महिला लोकशाही दिन हे प्रभावी व्यासपीठ आहे.
अर्ज विहित नमुन्यात असणे आवश्यक
महिला लोकशाही दिनामध्ये आपली समस्या मांडू इच्छिणाऱ्या महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावा. तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे.
न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसलेले अर्ज, आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसलेले अर्ज तसेच सेवा विषयक किंवा आस्थापना विषयक बाबींशी संबंधित तक्रारी व निवेदने स्वीकारली जाणार नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







