ग्रामीण आणि शहरी भागासाठी नियम समान; सिंधुदुर्गात तात्काळ अंमलबजावणी
सिंधुदुर्ग, दि. ९ : घरगुती LPG रिफिल बुकिंगसंदर्भात केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने महत्त्वाचा बदल केला असून, आता ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांसाठी LPG रिफिल बुकिंगमधील अंतर समानपणे २५ दिवस करण्यात आले आहे. या सुधारित निर्देशांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, नवी दिल्ली यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी Inter-Refill Booking Gap ४५ दिवस, तर शहरी भागातील ग्राहकांसाठी २५ दिवस होता. आता ग्रामीण भागासाठीही हे अंतर कमी करून २५ दिवस करण्यात आले आहे.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व घरगुती LPG ग्राहकांना मागील LPG रिफिल घेतल्याच्या तारखेपासून २५ दिवसांचे निर्धारित अंतर पूर्ण झाल्यानंतरच पुढील रिफिलचे बुकिंग करता येणार आहे.
सुधारित निर्देशांची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व LPG वितरक आणि गॅस एजन्सींना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी रिफिल बुकिंग करताना मागील रिफिलची तारीख लक्षात घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व घरगुती LPG ग्राहकांनी या सुधारित नियमाची नोंद घेऊन मागील रिफिलच्या तारखेपासून २५ दिवसांचे अंतर पूर्ण झाल्यानंतरच पुढील LPG रिफिलचे बुकिंग करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.






