सिंधुदुर्गनगरी, दि. ५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लेझर लाईट आणि बीम्स उपकरणांच्या सार्वजनिक वापरास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका, गणेशमूर्ती आगमन-विसर्जन तसेच विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर होण्याची शक्यता असते. लेझर किरण थेट डोळ्यांवर पडल्यास वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि किशोरवयीन व्यक्तींच्या डोळ्यांना इजा होऊन दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनियंत्रित वापराला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
१४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ते २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी लेझर लाईट किंवा बीम्स उपकरणांचा वापर करता येणार नाही.
दरम्यान, काही अपरिहार्य कारणास्तव लेझर लाईट किंवा बीम्स उपकरणांचा वापर करणे आवश्यक असल्यास पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार शिक्षेस पात्र कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






