कोकणातील प्रवासी वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक हा उत्तम पर्याय; शासनाने अनुदान द्यावे किंवा स्वतः बोटसेवा सुरू करावी
कणकवली : कोकणातील प्रवासी जलवाहतूक केवळ श्रीमंत नागरिकांपुरती मर्यादित न ठेवता ती सर्वसामान्यांसाठीही परवडणाऱ्या दरात लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी ‘सावरकर वॉरियर्स’ आणि ‘हिंदू विधीज्ञ परिषद’ यांनी केली आहे. कणकवली येथील शासकीय अतिथीगृहात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ‘सावरकर वॉरियर्स’चे प्रमुख तथा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे विक्रम भावे यांनी ही मागणी केली.
जलवाहतूक रस्ते आणि रेल्वेपेक्षा स्वस्त?
हिंदू विधीज्ञ परिषदेचे विक्रम भावे यांनी जलवाहतूक ही तुलनेने स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था असल्याचे सांगितले. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी रस्ते वाहतुकीचा खर्च प्रतिकिलोमीटर प्रतिटन ३.७८ रुपये, रेल्वे वाहतुकीचा १.९६ रुपये, तर जलवाहतुकीचा खर्च १.८० रुपये इतका असल्याचे नमूद केले.
जलवाहतूक तुलनेने स्वस्त असताना महाराष्ट्रात या पर्यायाचा व्यापक वापर का होत नाही, असा सवाल भावे यांनी उपस्थित केला. केवळ रस्ते बांधकामाची कंत्राटे कमी होतील म्हणून बोटसेवेचा विचार मागे ठेवला जात आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली.
जलवाहतुकीला अनुदान देण्याची मागणी
रेल्वे प्रवासाला शासनाकडून अनुदान दिले जाते. त्याच धर्तीवर सुरुवातीच्या काळात प्रवासी जलवाहतुकीलाही अनुदान देता येऊ शकते, असे विक्रम भावे यांनी सुचवले.
जलवाहतुकीसाठी रेल्वेचे रूळ, प्लॅटफॉर्म यांसारख्या पायाभूत सुविधांवरील खर्चाची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे रस्ते बांधकाम, रुंदीकरण आणि देखभालीवरील खर्चही कमी होऊ शकतो. त्यामुळे शासनाने स्वतःच्या कंपनीमार्फत प्रवासी बोटसेवा सुरू करणे किंवा या सेवेला अनुदान देणे व्यवहार्य ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा ताण
‘सावरकर वॉरियर्स’चे प्रमुख रणजित सावरकर यांनी कोकणासाठी प्रवासी जलवाहतूक अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
कोकणातून मुंबईत स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सव, यात्रा आणि अन्य सण-उत्सवांच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक कोकणात येतात. या काळात रेल्वे, एसटी, खासगी बस आणि खासगी वाहनांवर मोठा ताण निर्माण होतो.
कोकणाकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या अन्य राज्यांतून येत असल्याने उत्सवकाळात आरक्षण मिळणे कठीण जाते. विना आरक्षित प्रवास करणेही प्रवाशांसाठी मोठे आव्हान ठरते. विशेष रेल्वेगाड्या सोडूनही रस्ते वाहतुकीवर मोठा ताण येतो. या पार्श्वभूमीवर प्रवासी जलवाहतूक हा व्यवहार्य पर्याय ठरू शकतो, असे रणजित सावरकर यांनी सांगितले.
गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जलवाहतूक
गुजरातमध्ये हाजिरा ते घोघा दरम्यान प्रवासी जलवाहतूक यशस्वीपणे सुरू आहे. समुद्रकिनारा लाभलेल्या अनेक देशांमध्येही प्रवासी जलवाहतुकीचा प्रभावी वापर केला जातो.
महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी ‘कोकण शक्ती’, ‘कोकण सेवक’ आणि ‘दमानिया कॅटामरीन’ यांसारख्या प्रवासी जलवाहतूक सेवा कार्यरत होत्या. मात्र इतर क्षेत्रांत प्रगती करणारा महाराष्ट्र प्रवासी जलवाहतुकीच्या क्षेत्रात मागे पडल्याचे दिसत असल्याचे रणजित सावरकर यांनी नमूद केले.
बंदर विकासामुळे पर्यटनालाही चालना
प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याबरोबरच कोकणातील बंदरांचा विकास झाल्यास पर्यटन, स्थानिक बाजारपेठा आणि दळणवळणाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे प्रवासी जलवाहतुकीकडे केवळ वाहतुकीचा पर्याय म्हणून न पाहता कोकणाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही विचार करण्याची गरज असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
दरम्यान, हा विषय गंभीर असून ‘सुराज्य अभियान’च्या माध्यमातून प्रवासी जलवाहतुकीचा मुद्दा लावून धरला जाईल, असे डॉ. रविकांत नारकर यांनी यावेळी सांगितले.






