मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ-जरीमरी येथे २० वर्षीय युवतीने राहत्या घराजवळील आंब्याच्या झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाझिया सनाऊल्ला खान असे मृत युवतीचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ आफरीन चौधरी यांनी मालवण पोलीस ठाण्यात खबर दिली. गेल्या दोन महिन्यांपासून नाझिया ही बाहेर कामाला जात असल्याचे सांगत होती. मात्र कुटुंबीयांनी तिला बाहेर कामासाठी जाण्यास मनाई केल्यानंतर ती अबोल राहू लागली होती, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
शनिवारी रात्री कुटुंबीय घरात नमाज पठण करत असताना नाझिया घराबाहेर खुर्चीवर बसलेली होती. दरम्यान, तिचे वडील व भाऊ नमाज पठणासाठी वायरी येथील मशिदीत गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास नाझिया घरात अथवा अंगणात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला. त्यावेळी घराच्या जिन्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.
तत्काळ तिला खासगी रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेची मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत या पुढील तपास करीत आहेत.





