मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील तोंडवळी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने धडक कारवाई करत मध्यरात्री तीन डंपर पकडले. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीस आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवण महसूल विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारे तीन डंपर ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या वाहनांमध्ये डंपर क्र. GA-08-U-9918, GA-05-T-6656 व GA-06-T-0639 यांचा समावेश आहे.
कारवाईनंतर संबंधित तिन्ही डंपर मालवण तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी उमेश सिंगनाथ, मंडळ अधिकारी स्वप्नल जंगले, ग्राम महसूल अधिकारी आकाश कऱ्हाळे, प्रकाश गायकवाड, मौसमी शिरसाट, वाहन चालक भारत सिंगनाथ तसेच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.
महसूल विभागाकडून अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.







