Maharashtra Transport Department warns vehicle owners against fake RTO websites, suspicious mobile apps, and fraudulent e-challan links. Citizens are advised to report cyber fraud on the National Cyber Crime Portal or helpline 1930.
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील वाहनधारक व चालकांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (APK) आणि खोट्या ई-चलन लिंकच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन भरणा आदी सेवांच्या नावाखाली बनावट संकेतस्थळे तयार करून नागरिकांकडून बँक तपशील, ओटीपी व इतर गोपनीय माहिती घेतली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
तक्रार कुठे करावी?
कोणताही संशयास्पद संदेश, लिंक किंवा कॉल प्राप्त झाल्यास तात्काळ National Cyber Crime Portal (https://cybercrime.gov.in) येथे ऑनलाइन तक्रार नोंदवावी. तसेच सायबर फसवणूक हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी केले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- अधिकृत RTO सेवा वापरताना केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा.
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
- ओटीपी, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये.
- मोबाईलमध्ये संशयास्पद APK फाइल्स डाउनलोड करू नयेत.
परिवहन विभागाने नागरिकांना जागरूक राहून फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.





