In Malvan, a seriously injured stray cow was rescued by local cow volunteers and Bajrang Dal members and shifted to the Gaay Vasaru Goshala in Khambale, Vaibhavwadi, for treatment and care.
मालवण | प्रतिनिधी
मालवण शहरात गेले अनेक दिवस पायाला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत एक बेवारस गाय फिरत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गोसेवक आणि बजरंग दलाच्या युवकांनी तत्काळ पुढाकार घेत त्या गायीला उपचारासाठी सुरक्षित स्थळी हलवले.
या संदर्भात वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील गाय वासरू गोशाळा खांबाळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सुरुवातीला गोशाळेत जागा उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली; मात्र गायीची गंभीर परिस्थिती लक्षात घेता गोशाळेचे प्रफुल्ल पवार यांनी विनंती मान्य करत गायीला आश्रय देण्यास सहमती दर्शवली.
स्थानिकांनी केली तीन दिवस सेवा
मालवणमधील बाळा सादये यांनी संबंधित गायीला आपल्या ताब्यात घेत तीन दिवस सेवा केली. डॉक्टरांना बोलावून तिच्यावर प्राथमिक उपचारही करण्यात आले. तसेच गायीच्या मालकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले होते; मात्र कोणीही संपर्क साधला नाही.
यानंतर गोसेवक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी समन्वय साधत अखेर बुधवारी गायीची खांबाळे येथील गोशाळेत रवानगी केली. यावेळी तेजस लुडबे, नगरसेवक ललित चव्हाण, निकित वराडकर, अनिश तळगावकर, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्रीराज बादेकर, दर्पण सादये, अनिकेत तळगावकर, आदित्य लुडबे, वैभव लुडबे, तेजस नार्वेकर आदी उपस्थित होते.
गोसेवकांनी या कार्यासाठी गोशाळा प्रशासन व बाळा सादये यांचे आभार मानले. जखमी जनावरांप्रती संवेदनशीलता दाखवत केलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.







