Maharashtra Deputy CM Eknath Shinde signals cabinet reshuffle, warns ministers over poor performance and orders review of election setbacks across regions.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातील सुमार कामगिरी करणाऱ्या तीन ते चार मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत “भाकरी फिरवण्याचे” स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी काळात मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर जिल्ह्यांमध्ये निवडणुकीतील कामगिरी समाधानकारक नसल्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील अपयशाची सखोल कारणमीमांसा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, संबंधित मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तीन ते चार मंत्र्यांच्या खुर्च्या सध्या धोक्यात असून सुमार कामगिरी करणाऱ्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सचिव व जिल्हा संपर्कप्रमुखांना विशेष दौरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणुकीत मागे पडलेल्या जिल्ह्यांमध्ये जनतेशी थेट संवाद वाढवणे, संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणे, या उद्देशाने हे विशेष दौरे आखण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मंत्र्यांच्या कामगिरीवर कठोर भूमिका घेऊन आगामी काळात पक्ष व सरकारची प्रतिमा अधिक बळकट करण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.







