Legal awareness stall set up during Anganewadi Bharadi Devi Yatra in Malvan by District Legal Services Authority, Sindhudurg to guide pilgrims on legal schemes and rights.
मालवण | प्रतिनिधी
आंगणेवाडी येथील भराडी देवी यात्रोत्सवानिमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रेकरूंमध्ये विधीसेवेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष माहिती दालन उभारण्यात आले होते.
या उपक्रमातून यात्रेमध्ये सहभागी झालेल्या भाविक व नागरिकांना मोबाईल व्हॅनद्वारे लोकअदालत योजना, राष्ट्रीय लोकन्यायालय, मध्यस्थी प्रक्रिया, बालकांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, विधी सेवा प्राधिकरणाचे कायदेविषयक कार्य, रॅगिंग प्रतिबंधक कायदा, गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, माजी सैनिकांसाठी वीर परिवार सहायता योजना–२०२५ तसेच इतर महत्त्वाच्या कायदेशीर विषयांबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करून विधी सेवांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. सामान्य नागरिकांना मोफत कायदेशीर मदत, सल्ला व न्यायालयीन प्रक्रियेबाबत जागरूक करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया अनेक यात्रेकरूंनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक अधीक्षक एस. एन. पालव, तालुका विधी सेवा समिती, मालवणचे पॅनल लॉयर्स अॅड. अक्षय सामंत, अॅड. प्राजक्ता गावकर, अॅड. सुमित जाधव, कनिष्ठ लिपीक मिलिंद जाधव, वरिष्ठ लिपिक जे. टी. फर्नांडीस, विधी स्वयंसेवक संदेश कोरगावकर, प्रथमेश देसाई, पूजा कुबल, वत्सला मणचेकर, तत्कालीन विधी स्वयंसेवक विजय कांबळी तसेच चपराशी डी. एस. चव्हाण व पी. ए. तारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले







