Book launch of ‘Dhyeyadhund’ on the life and leadership of Suresh Prabhu to be held on Shiv Jayanti, 19 Feb 2026, at Savarkar National Memorial, Dadar, Mumbai, with eminent guests.
सावंतवाडी | प्रतिनिधी :
भारताच्या सार्वजनिक जीवनातील अभ्यासू, प्रगल्भ आणि दूरदर्शी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे, तसेच कोकणचे सुपुत्र असलेले सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा मागोवा घेणाऱ्या ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ (शिवजयंती) रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना साक्ष ठेवणाऱ्या पावन दिवशी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, दादर (पश्चिम) येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. सार्वजनिक जीवनातील मूल्यनिष्ठ परंपरेला अभिवादन करणारा हा सोहळा ठरणार आहे.
ॲड. नकुल पार्सेकर लिखित ‘ध्येयधुंद’ हे पुस्तक स्वामीराज प्रकाशन आणि वर्धमान श्रुतगंगा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होत आहे. या ग्रंथातून सुरेश प्रभू यांच्या व्यक्तिमत्त्वातील तीन महत्त्वाच्या धारांचा—सुशासन, प्रभावी धोरणनिर्मिती आणि लोकाभिमुख दृष्टिकोन—सार्थ उलगडा करण्यात आला आहे. राजकारणातील त्यांच्या प्रवासात लाभलेली विविध जबाबदाऱ्या, धोरणात्मक दूरदृष्टी, तसेच राष्ट्रहितासाठी घेतलेले निर्णय यांचा चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण आढावा या पुस्तकात घेतला आहे. हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचा जीवनवृत्तांत नसून, सार्वजनिक जीवनातील नैतिकता आणि कार्यक्षम प्रशासनाची प्रेरक कहाणी आहे.
या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय अतिथी म्हणून विख्यात वास्तुविशारद शशी प्रभू, एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्डचे संचालक सतीश मराठे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, अर्थतज्ज्ञ व ‘कालनिर्णय’चे व्यवस्थापकीय संचालक जयराज साळगावकर, तसेच ज्येष्ठ सनदी लेखापाल व एस.बी.आय.चे माजी संचालक प्रफुल्ल छाजेड यांची उपस्थिती कार्यक्रमाला वैचारिक वैभव बहाल करणार आहे.
राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा लोकसेवेच्या मूल्यांचा उत्सव ठरणार असून, सार्वजनिक जीवनातील अभ्यासक, तरुण नेतृत्व आणि वाचकांसाठी तो एक प्रेरणास्थान ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्वागत समितीच्या वतीने ॲड. नकुल पार्सेकर, मोहन होडवडेकर आणि सहकाऱ्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वैचारिक पर्वाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन केले आहे.





