मुंबई : (प्रतिनिधी)
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची सविस्तर यादी त्यांच्या गुणांसह संबंधित विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. भरती प्रक्रियेत विविध नाविन्यपूर्ण बदलांचा समावेश करून सविस्तर कार्यपद्धती जाहीर करण्यात आली असून, त्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.
या नव्या निर्णयामुळे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तासिका तत्त्वावरील, कंत्राटी तसेच ॲडहॉक तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कालावधीत केलेल्या अध्यापन कार्याचा अनुभव पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
अनेक सहाय्यक प्राध्यापक हे वर्षानुवर्षे तासिका, कंत्राटी व ॲडहॉक पद्धतीने कार्यरत असून, त्यांच्या दीर्घकालीन अनुभवाची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत न्याय्यतेसोबतच पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून, पात्र उमेदवारांना संधी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.







