कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक कार्यक्रमात आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये पालघर- 4, रायगड- 10, रत्नागिरी- 7, सिंधुदुर्ग- 4, ठाणे- 2 अशा कोकण विभागात एकूण 27 ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कोकण बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या निमित्ताने उदय सामंत, योगेश कदम, भरत गोगावले आणि आमदार निलेश राणे यांनीही आपले स्बळाची ताकद दाखवली आहे. तर दुसरीकडे प्रबळ विरोधक असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लोकसभा विधानसभा निकालानंतर भास्कर जाधव, बाळ माने, आणि वैभव नाईक या तिन शिलेदारांच्या भरवशावर ही निवडणूक लढवण्याची भिस्त आहे.
एकीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या कोकण गडात आता शिवसेनेच्या दुफळीनंतर अनेक समीकरण बदलली असल्याने स्वबळासाठी आता प्रत्येकाला आपली ताकद दाखवणे क्रमप्राप्त झालंय म्हणूनच ही निवडणूक सत्ताधारी मित्रपक्षासाठी आपली ताकद दाखवण्याची संधी बनली आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग नगरपालिका , कर्जत नगरपालिका , खोपोली नगरपालिका , महाड नगरपालिका , माथेरान नगरपालिका , मुरुड- जंजिरा नगरपालिका , पेण नगरपालिका , रोहा नगरपालिका , श्रीवर्धन नगरपालिका , आणि उरण नगरपंचायत यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण नगरपालिका , देवरुख नगरपंचायत, गुहागर नगरपालिका , खेड नगरपालिका , लांजा नगरपंचायत , राजापूर नगरपालिका आणि रत्नागिरी नगरपालिका ह्या निवडणुकाही महत्त्वाच्या आहेत.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली नगरपंचायत, मालवण नगरपालिका , सावंतवाडी नगरपालिका आणि वेंगुर्ला नगरपालिकाच्या निवडणूका नेमका बालेकिल्ला कुणाचा याचा कौल देणार आहे. तर ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ आणि कुळगाव- बदलापूर या दोन नगरपालिकेच्या निमित्ताने ठाणे कुणाचे यावर राजकीय कुरघोडीचे गणित लपलेले आहे.
एकूणच पाहता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या या निवडणूकीच्या निमित्ताने ही निवडणूक वॉर्डातील असली तर सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिष्ठेला पणाला लावणारी बनली आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान; तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहेत. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 18 नोव्हेंबर 2025 रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. आणि त्याच दिवशी खऱ्या विजयाचा गुलाल हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारा ठरणार आहे.






